Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

Amitabh Bachchan | न मिटणारी दगडावरची रेघ

अमिताभ बच्चन यांचं यश पिता हरीवंशराय बच्चन यांनी ढकलत आणलेल्या दगडावरच्या रेघेसारखं 

Picture of Eminent writer and in inset his Superstar Son
Photo courtesy Google | Designed on Canva 



हरीवंशराय बच्चन यांनी ढकलत आणलेल्या दगडाची गोष्ट | दगडावरची रेघ| Set in stone

 

७० च्या दशकात उठलेली अमिताभ बच्चन या वादळाची धूळ अजून बसली नाही . असे शाश्वत यश मिळण्यामागे पित्याची पुण्याई असणारच.

हरीवंशराय बच्चन यांनी आपल्या ‘दशद्वारसे सोपान तक’ या आत्मचरित्रात लिहिलेल्या एका आठवणीचा काढलेला खालील अन्वयार्थ अतार्किक वाटू शकतो. क्षमस्व.

 

हरीवंशराय बच्चन यांची आठवण 

एक मोठा दगड अलाहाबादच्या रस्त्याच्या कडेला पडून होता. कवी हरिवंशराय बच्चनजी रोज सकाळी या रस्त्यावरून परिक्रमा करण्यासाठी जात. एके दिवशी घरी परतताना त्यांची नजर त्या रस्त्याच्या कडेला पडलेल्या दगडावर पडली. त्यांच्या मनात काय आले, कोण जाणे, बच्चनजी त्या दगडाजवळ गेले आणि जोर लावून त्याला पुढे ढकलण्याचा प्रयत्न त्यांनी केला. दगड काही इंच पुढे सरकला. बस, तेव्हापासून बच्चनजींचा हा नित्यक्रम चं होवून गेला. सकाळची परिक्रमा करून परतताना, बच्चन जी त्या दगडाजवळ थांबत आणि रोज त्याला त्यांच्या घराच्या दिशेने काही इंच ढकलत. अगदी नेमाने. तसे हरिवंशराय जी साधारण शरीरयष्टीचे होते आणि त्या काळात त्यांची तब्येतही तशी बरी रहात नसे. पण रोज न चुकता त्यांनी तो दगड घराच्या दिशेने ढकलण्याचा संकल्प सुरूच ठेवला.

 रोज काही इंच ढकलत ढकलत शेवटी तो दगड एके दिवशी हरीवंशराय बच्चनजींच्या घरापर्यंत पोहोचला. हरिवंशरायजींनी हट्ट केला होता. कदाचित हे त्यांनी शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी एक व्यायाम म्हणून केलं असावं. असं ही असेल की कवीमनाच्या हरिवंशरायजींना रस्त्याच्या कडेला पडलेल्या त्या बेवारस दगडाला घराचं सुख द्यायचं असेल.  जग दुनियेच्या दशद्वारातील अनुभूतींना लेखक लोक असेच महत्प्रयासाने ढकलत ढकलत जाणिवांच्या सोपाना पर्यंत आणत असतात. हे प्रयास कुणाच्याही लक्षात येत नाहीत. तप्त लाव्हा रसाचा अनुभव घेवून शांत झालेल्या, गोठलेल्या अनुभुतींना मात्र या महतप्रयासांची जाण असते. 

हरीवंशराय बच्चन यांनी ढकलत घरापर्यंत आणलेल्या त्या दगडानेही त्यांना याच जाणिवेने आशिर्वाद दिला असणार ‘जितके कष्ट आणि अपयश तू आयुष्यभर सहन केले आहेस, त्याच्या हजार पट जास्त सुख आणि यश तुझ्या मुलाच्या म्हणजेच अमिताभच्या पदरी पडेल, आणि हे यश दगडावरच्या रेघेसारखं शाश्वत आणि अमिट राहील’

७० च्या दशकात उठलेल्या अमिताभ बच्चन या वादळाची धूळ अजूनही आसमंतात उडत रहाते. ही धूळ कधीच बसणार नाही…ही दगडावरची रेघ आहे.

अमितजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

– अविनाश घोडके

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment